धैर्य धारण करा

       

Be patient, धैर्य धारण करा
Be-patient 

       पाण्याचा प्रवाह उथळ असेल, तर त्याची खळखळ जोरात असते. तद्वतच व्यक्तीची समजूत उथळ असेल, तर ती जीवन जगताना साध्या साध्या बाबतीत खळखळ करते. अशी खळखळ करता करता व्यक्ती प्रत्यक्षात खळ बनून जाते. कमजोर शरीराच्या व्यक्तीला जरासा वातावरण बदल सहन होत नाही. दुबळे मन भावनिक आवेग सहन करू शकत नाही. प्रलयाच्या चंडवातामुळे पालापाचोळा आकाशात उडावा, त्याप्रमाणे भावनिक वादळात तो सैरभैर होतो. वादळाच्या माथ्यावर पाय रोवून जो उभा राहतो, तोच खरा योद्धा.
             दिवसागणिक येणारी पिढी भावनिकदृष्ट्या कमकुवत निपजत आहे. अपयश पचविता येत नाही. यशाचाही निर्भेळ आनंद घेता येत नाही. नकार जिव्हारी लागतो. बापाने मोबाईल दिला नाही, म्हणून आत्महत्या करणारी लेकरं घराण्यात जन्माला येत आहेत. अशी प्रजा असल्यापेक्षा नसलेली परवडली. वाईट पुत्राच्या मृत्यूने एकदा दुःख होतं, जगला तर तेच दुःख रोज भोगावं लागतं. सगळं तात्काळ हवं आहे. साधना आणि संयम हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही. म्हणून सिद्धी प्राप्त होत नाही. कारण धीर म्हणजे काय याचा अर्थच त्यांना ठाऊक नाही. धैर्य हा दैवी गुण आहे. धैर्य तुम्हाला योद्धा बनवतं. धैर्यशील व्यक्तीची वाटचाल दिव्यत्वाकडे होते.
             यश-अपयश, सुख-दुःख, लाभ-हानी हे जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. गीता सांगते, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ। ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि।। कोणत्याही परिस्थितीत चित्ताची समता ढळता कामा नये. अनेक जीवलग सवंगड्यांच्या रक्ताच्या सिंचनाने उभं केलेलं हिंदवी स्वराज्य मोगलांच्या झोळीत घालावं लागलं, तरी छत्रपती शिवरायांच्या चित्ताची समता ढळली नाही. सकाळी राज्याभिषेक होणार या आनंदात रात्री झोपलेला एक राजकुमार दुसऱ्या दिवशी अनवानी पायाने अरण्याची वाट चालू लागतो. एकेका संकटाच्या माथ्यावर भक्कम पाय रोवून उभा राहतो आणि अवघ्या हिंदुस्तानच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारा महासम्राट 'राजा रामचंद्र' होतो. धैर्यवान कायम विजयी होतो.
            इंद्रियांचे आवेग अनावर व्हावेत, जुनाट रोग अचानक उद्भवावा, प्रिय व्यक्तीचा वियोग व्हावा आणि अप्रिय व्यक्तीचा योग यावा. या सर्वांचा एकाच वेळी पूर आला, तरी जो अगस्तिप्रमाणे निश्चल राहतो, त्याला धैर्यवान पुरुष म्हणतात. आकाशामध्ये कितीही जोराचा धुराचा लोट उठला तरी, त्याला वारा एका झुळुकेसारखा गिळून टाकतो. त्याप्रमाणे आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक तापांना जे गिळून टाकते, ते धैर्य होय. ज्ञान व योग हे ईश्वरप्राप्तीचे मार्ग आहेत. यांचे आचरण केल्याने चित्तात धैर्य उत्पन्न होते. चित्तात गडबड होण्याच्याप्रसंगी जी सहनशीलतेने पराक्रम गाजवते, तिला धृति (धैर्य) असे म्हणतात. माऊली म्हणतात, ऐसें चित्तक्षोभाच्या अवसरीं । उचलूनि धैर्या जें चांगावें करी । धृति म्हणिपे अवधारीं । तियेतें गा।

रमेश वाघ, नाशिक

संपर्क 9921816183

Be patient
Be-patient 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या